विकेंडचा सिसिफस

 सरासरी सत्तर वर्षांचा माणसाच्या जगण्याचा तुकडा असतो. अर्थात, हरारी म्हणतो तशी ही सरासरी नजीकच्या ते दूरच्या भविष्यात वाढून दिडशे किंवा त्याहून अधिक वैगेरे झाली तरी ती उच्चउत्पन्न गटासाठी असेल.  क्वांटाईल रेशो किंवा गिनी कोइफीशंट वैगेरे नुसार दिसणारी उत्पन्नातील तफावत नजीकच्या भविष्यात कमी होईलशी वाटत नाही. उच्चउत्पन्न गटाची जगण्याच्या वयाची सरासरी वाढेल असं मानलं तरी त्याचा एकूण सरासरीवर इतका प्रभाव पडेल असं वाटत नाही. त्यामुळं साधारण सध्या (आशावादी / सकारात्मक / सैल दृष्टिकोन ठेऊन) माणसाच्या जगण्याचा तुकडा सत्तर वर्षांचा असून नजीकच्या भविष्यात या सरसरीत जास्त बदल होणार नाही असं मानू.


४.६ अब्ज वर्षांपूर्वी आपल्या सुर्यमालेची निर्मिती झाली असं मी शेवटच्या वाचलेल्या विज्ञानाच्या एका शालेय पुस्तकात लिहिलं होतं. (त्यानंतर अभ्यासक्रमात काही बदल असेल तर माहिती नाही.) आणि अशाच एका पुस्तकात वाचल्यानुसार कुठल्याही ताऱ्याचं एक आयुष्य असतं आणि त्याच्या अवस्था असतात, ज्यात शेवटची अवस्था ही कृष्णविवर अवस्था (ताऱ्याच्या प्रकारानुसार) असू शकते. आज दुपारी chatgpt वर एका प्रश्नाला असं उत्तर आलं की आपल्या सूर्याच्या आयुष्यचक्रातील red giant ही अवस्था साधारण ७.६० अब्ज वर्षांनी येईल, तेव्हा वाढलेल्या उष्णतेने पृथ्वीचं अस्तित्व संपुष्टात येईल. साधारण ३ लाख वर्षांपूर्वी  माणसाची उत्क्रांती होत होमो सेपियन अस्तित्वात आला. (अर्थात, उत्क्रांतीचं प्रकरण काढून टाकलं तरी उल्लेख केला म्हणून कुणाच्या भावना दुखवल्यास क्षमस्व). सूर्याची red giant अवस्था ७.६० अब्ज वर्षांनी येऊन पृथ्वीचं अस्तित्व संपुष्टात येणार असलं असली तरी पृथ्वीवरील जीवन (विशेषतः मानवजीवन) नष्ट होण्याची प्रक्रिया मानवोद्भव (anthropogenic) कारणांनी कधीच सुरू झाली आहे असं मानलं जातं. ("असं मानलं जातं" असं लिहायचं कारण हवामान बदल (climate change) हे थोतांड आहे असं मानणाऱ्या लोकांचा एक गट आहे, त्यांच्या भावना दुखायला नको.) तर red giant अवस्थेच्या पूर्वीच पृथ्वीवरील जीवन संपुष्टात येऊ शकतं. पण तरी आपण अतिशय आशावादी/सकारात्मक वैगेरे विचार करून मानवोद्भव कारणांनी पृथ्वीवरील जीवन नष्ट होणार नाही असं समजू. आणि अजून शंभरएक वर्षांनी समुद्रपातळी वैगेरे वाढणार नाही, ओझोनचा थर दाट होईल, कार्बनउत्सर्जन थांबेल, अपारंपरिक ऊर्जेचा वापर प्रचंड वाढेल, माझ्यासारखे लोक जिक्सरसारखी पेट्रोल पिणारी गाडी सोडतील, आणि मोठ्या प्रवासाला बसचा वापर करतील वैगेरे इत्यादी इत्यादी बदल होतील आणि आणि मानवोद्भव कारणांनी पृथ्वीवरील जीवनाला धक्का लागणार नाही असं समजू. (!!) तसंच हरारी किंवा तत्सम लोकांनी सांगितलेले मानवोद्भव धोकेही असणार नाहीत असा अतिउत्साही,दुपारी good morning म्हणायला लावणाऱ्या एखाद्या मोटीवेशनल स्पीकर सारखा अतिसकारात्मक विचार करू. तरीही मानवोद्भव कारणं सोडली तरी butterfly effect नुसार कुठल्याही कारणानं पृथ्वीवरील जीवन ७.६० अब्ज वर्षांच्या कितीतरी आधीच नष्ट व्हायला सूरु होईल असा (आता कसा जागेवर आला, पेसीमिष्ट साला!) वास्तववादी विचार करु. तर वरील विवेचनानंतर असं (उगाच काही वैज्ञानिक वैगेरे आधाराशिवाय आपलं मानायचं म्हणून, for sake of argument वैगेरे) मानू की अजून २ अब्ज वर्षं तरी पृथ्वीवरील जीवनाला काही होतं नसतं. 


आजपूर्वी ३ लाख वर्ष ते अजून दोन अब्ज वर्षं इतका मोठा काळ मानवी अस्तित्वाचा आहे. हा झाला काळ. आता अवकाशाचा विचार करू. नासाने सुर्यमालेच्या अभ्यासासाठी सोडलेल्या Voyager 1 या अवकाशयानाने पृथ्वीपासून ६ अब्ज किलोमीटरवरून घेतलेला पृथ्वीचा "Pale Blue Dot" नावाचा फोटो हा पृथ्वीचा सगळ्यात जास्त अंतरावरून घेतलेला फोटो आहे, जो मी सोबत पोस्ट केला आहे. Voyager 1 सोबत पृथ्वीवरील फोटो-आवाज-संदेश पाठवले आहेत. हे सगळं पाठवलं आहे पृथ्वीबाहेर असू शकणाऱ्या सजीवांसाठी (अर्थात लोकप्रिय भाषेत "एलियन्स"),त्यांना पृथ्वीवरचं जीवन कसं आहे हे समजण्यासाठी. आवाजांच्या यादीत गाणी आहेत, ज्यात भारतातील शास्त्रीय गायिका केसरबाई केरकर यांच्या आवाजातील एक गाणं आहे.

     (Voyager 1's Pale Blue Dot)


तर सांगायचं काय होतं की Voyager 1 ने ६ अब्ज किलोमीटरवरून घेतलेल्या फोटोमध्ये पृथ्वी एक ठिपका दिसतेय, यावरून विश्वाच्या अफाट पसाऱ्याची कल्पना यावी. 


तर मानव अस्तित्वाचा आजपूर्व ३ लाख ते आजउत्तर २ अब्ज एवढा अफाट काळ आणि वर वर्णन केल्याप्रमाणे विश्वाचा अफाट पसारा. तसंच मानवाच्या पूर्वीही साधारण साडेचार अब्ज वर्षांपुर्वी अस्तित्वात आलेली आपली सूर्यमाला, आणि साधारण साडेतेरा अब्ज वर्षांपुर्वीचा big bang. म्हणजे आजपूर्व साडेतेरा अब्ज वर्ष ते आजउत्तर साधारण साडेसात अब्ज वर्ष, तसंच आपण बसलोय ते ठिकाण ते Voyager 1 ने जिथून पृथ्वीचा फोटो काढला ते ठिकाण. ह्या आहेत मानवाने अंदाज केलेल्या काळ-अवकाशाच्या सीमारेषा. या एवढ्या पसाऱ्यात सरासरी सत्तर वर्षं! हे झालं ज्ञात-वर्गीकृत-काही-काही परिमाणं वैगेरे लावून तपासलेल्या-अभ्यासलेल्या वास्तवाबद्दल. मग पर्यायी वास्तव, पर्यायी विश्व-स्वप्नातील वास्तव वैगेरे गोष्टी सध्यातरी सायन्स फिक्शनच आहेत. (गेल्या दशकातील सायन्स फिक्शनमधील कथांसारख्या किंवा दोन्ही शतकांच्या मधील "Matrix" सारख्या किंवा या शतकातील "Her" सारख्या.)


तर या सरासरी सत्तर वर्षांतील अर्ध्याहून अधिक आयुष्य हे सिसिफससारखं दगड डोंगरावर चढवून परत खाली सोडून परत वर चढवण्यात जातं. सिसिफस आनंदी असला पाहिजे असा विचार करून इमानइतबारे दगडाची हालचाल करत राहावंच लागतं. दगड डोंगरावर नेऊन खाली सोडून दिल्यावर खाली जाइपर्यंतचा वेळ सिसिफसचा असतो. उस्को विकेंड बोलते ग्लोबलाइजड slang मै. सोसल मीडिया वर हॅशटॅग विकेंड असं सर्च केलं तर सिसिफसचा तो वेळ तुम्ही पाहू शकता. 

(ग्रीक पुराणातील (mythology) एक पात्र - सिसिफस. ज्याला एक दगड एका डोंगरावर चढवत न्यायचा, आणि वर पोहोचल्यावर परत खाली सोडायचा आणि परत वर चढवत न्यायचा असं शेवटपर्यंत करत राहायचं अशी शिक्षा मिळालेली असते. या पात्रावर Alber Camus या फ्रेंच लेखकाने "the myth of Sisyphus" हा निबंध लिहिला आहे. त्या निबंधातील " Sisyphus must be Happy" हे वाक्य प्रसिद्ध आहे.)


तर एवढ्या प्रचंड मोठ्या विश्वाच्या काळ-अवकाशाच्या आवाक्यात ठिपक्याएव्हढ्या पृथ्वीवर आणि सत्तरशा वर्षांच्या इवल्याशा आयुष्यात (अर्थात "इवल्याश्या आयुष्यात" या उल्लेखाबद्दल व्यक्तिवादी लोकांच्या आणि how beautiful morning it is वाल्या लोकांच्या  कदाचित दुखावलेल्या भावनांबद्दल स्वारी मागतो) अर्ध्याहून अधिक आयुक्ष्य सिसिफस बनून जगावंच लागतं. एक जर्मन वृद्ध म्हणतो तसं किंवा बिहारला एका माणसाला जे जाणवलं होतं तसं हे सगळं अस्तित्व असतं. त्यातुन तगून राहायला कला-तत्वज्ञान नाहीतर वैराग्य असा मार्ग जर्मन वृद्ध सांगतो, तर बिहारच्या माणसानं संतुलनाचा मार्ग सांगितला. 


अर्थात, आणखी एक जर्मन माणसानं सांगितलं की एवढा मोठा वाटणारा काळ हा सापेक्ष आहे. आजपूर्व तीन लाख ते आजउत्तर साडेसात अब्ज एवढ्या काळाच्या आवाक्यात सत्तर वर्षं म्हणजे एका मोठ्या कागदावरील एक बिंदू असेल, पण २०-२५ दिवसांचं आयुष्य असलेल्या माशीच्या आयुष्याच्या तुलनेत दहा वर्षही किती मोठा काळ असेल! आणि डोळ्यांना न दिसणारा पॅरामोशीयम सूक्ष्मदर्शिकेखाली किती मोठा पॅरॅगॉनसारखा दिसत असेल! 


तर सिसिफसला काळ आणि अवकाश एकाच वेळी खूप जास्त मोठा आणि खूप कमी असल्याचा संतुलित विचार करावा लागेल. 


सिसिफस जसा वीस - पंचवीस वर्षांपुर्वी चांदण्या बघायचा आणि आजोबांबरं चांदण्यांबद्दल आणि त्याखालील जगाबद्दल बोलायचा, तसा तो आताही कधीकधी दगड खाली सोडल्यावर चांदण्या बघत बसतो. मग त्या काळ्या पार्श्वभूमीवरील पांढरे ठिपके पाहत, शांत शांत भावतालात आणि मोकळी स्वच्छ हवा अंगावर घेत विश्वाच्या अफाट पसाऱ्याबद्दल, गेववेगळ्या वास्तवाबद्दल, डिस्टपिया-युटोपीया बद्दल  मोकळ्या आकाशासारखे विचार करत बसतो, यादृच्छीक विचार! आणि विचारांच्या घुसळणीतून अर्थ शोधत राहतो, दगड खाली पोहोचेपर्यंत. 


- अभिजित कदम.


Comments

Popular posts from this blog

मैत्रीचा हाफ लाईफ पिरियड