मैत्रीचा हाफ लाईफ पिरियड

मैत्रीचा हाफ लाईफ पिरियड

 

प्रत्येक गोष्टीची किंवा त्या गोष्टीच्या स्वरूपाची एक expiry date असते. तशी मैत्रीचीही expiry date असावी, असा विचार बऱ्याचदा येऊन गेला होता. बऱ्याचदा काही विशिष्ट मुद्द्यावरून सुरू झालेली मैत्री तो मुद्दा संपुष्टात आला तर हळूहळू कमजोर होत जाते. तसंच विशिष्ट परिस्थितीमुळ एका वातावरणात यावं लागल्यानं मैत्री सुरू होते.  ते विशिष्ट परिस्थितीजन्य वातावरण, त्या वातावरणात मित्रांच्या गटात झालेले उदव्याप आणि एकत्र असण्याच्या कालावधीच प्रमाण आणि त्या विशिष्ट परिस्थितीतून बाहेर आल्यानंतर परत भेटण्याची वारंवारीता यावरून मैत्रीची expiry date किती दूरची असेल याचा अंदाज बांधता येतो.

 

उदा. शाळा ही विशिष्ट परिस्थिती मानून त्यातील त्यातील एकत्र येणारे मित्र, त्यातील जास्तीत जास्त वर्षे एकच वर्गात असणारे, एकत्र असताना काहीतरी उद्व्याप केलेले, आणि शाळा संपल्यानंतरही भेटण्याची वारंवारीता जास्त असणाऱ्या मित्रांच्या मैत्रीची expiry date जवळपास मित्रांच्या expiry date पर्यंत मोठी असू शकते, कारण मैत्री अशी मैत्री घट्ट होत जात असतानाच ताजीही राहत जाते.

 

आता शाळेतील मित्रांचं दुसरं उदाहरण म्हणजे शाळेत घट्ट मैत्री असणारे पण शाळेनंतर भेटण्याची वारंवारीता कमी कमी होत जाणारे. अशा मित्रांमध्ये परत भेटी न झाल्यामुळे मैत्री ताजी आणि जिवंत राहण्यासाठी कुठलीच गोष्ट नसते. यातील काही कधी भेटले तर शाळेतील आठवणींच्या नॉस्टॅल्जियाला पकडून मैत्री जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतात, अशी मैत्री जमिनीत अतिशय खोलवर असणाऱ्या पाण्यावर मुळं कशीबशी पोहोचून तगून राहणाऱ्या रोपट्या सारखी किंवा एखाद्या मोठ्या झाडाच्या बोन्सायसारखी असते.  मरत नाही पण वाढतही नाही.

 

शाळेतील तिसरं उदाहरण वेदनादायक असतं. शाळेत असताना आपल्याच टोळक्यात असणारे आपले मित्र शाळेनंतर एकदम तुटूनच जातात. काही स्थलांतरामुळे निसटून जातात, काही भेटण्याची वारंवारीता कमी झाल्यामुळे किंवा आणखी कुठल्यातरी कारणाने दूर होतात, ते परत पुन्हा कधी समोरून गेले तरी ओळखत नसल्यासारखे जातात किंवा कसनुस हसून जातात. कधी बोलायची वेळ आलीच तर स्पष्ट जाणवतं की शाळेत किती दोस्त असले तरी आता त्या मैत्रीचा ओलावा क्षीण होऊन संपत आला आहे. मैत्री expire होत आली आहे. अर्थात, हे नैसर्गिक होतच असावं. पण अशी मैत्री expire होत आली असल्याची जाणीव वेदनादायी असते.

 

मैत्रीचा आणखी एक टप्पा असतो तो म्हणजे तो कॉलेज/ नोकरी / व्यवसायानिमीत्त झालेली मैत्री. अशी मैत्री साधारणत: आवडीनिवडी, स्वभाव इत्यादी गोष्टी सामायिक असल्यावरून होत असते.

नोकरी / व्यवसाय जर एकाच ठिकाणी असणार असेल तर मग अशा मैत्रीची expiry date मित्रांच्या expiry date इतकी मोठी असू शकते. पण नोकरी/व्यवसाय याचं ठिकाण बदलतं राहणार असेल, तर मग जाणीपूर्वक प्रयत्न केले नाहीत तर शाळेतील दुसऱ्या किंवा तिसऱ्या सलाईनवरील वेदनादायी प्रकारात ती मैत्री जाऊ शकते.

 

आणखी एक मैत्री असते ती बालमित्र भाऊ नातेवाइकातील समवयस्क मित्रांमधील मैत्री. अशा मैत्रीलाही शाळेतील उदाहरणे लागू पडतात.

 

साधारणत: कॉलेजमधील मैत्री ही नोकरी/व्यवसाय निमित्त झालेल्या मैत्रीसारखी आवडीनिवडी, स्वभाव इत्यादी वरून होऊ शकते. तसंच काही विशिष्ट परिस्थीतीमूळंही होऊ शकते. ती विशिष्ट परिस्थिती आपल्या हातात असतेच असं नाही. पण त्या निमित्ताने एकत्र येऊन मैत्री होते. कॉलेजमध्ये डोक्याला शिंगं फुटत असतात, अल्लडपणा आणि उथळपणा कुटून भरलेला असतो. त्यामुळं जास्तीत जास्त उदव्याप- राडे केलेले/झालेले असतात. अशी मैत्री चांगलीच घट्ट होते, एकदम expiry date नसेलच अशी वाटणारी.

 

पण कॉलेज संपतं. सुरुवातीला सगळे नोकरी  उद्योगाला लागतात, आणि त्यानंतर सुरू होते दुनियादारी. रंग दे बसंती मध्ये DJ म्हणतो तस “कॉलेज के इस साईड पे हम जिंदगी को नचाते है, और कॉलेज के उस साईड पे जिंदगी हमे!”. सुरुवातीला कुणाच्या लग्नात, दिवाळीत, आणि काहीही निमीत्त काढून भेटी होतात. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी कितीही मुखवटे चढवून मोठे समजदार mature झाल्याच्या मिजासी करत असले तरी अशा भेटीमध्ये स्वत: मधील अल्लड उथळ शिंगं फुटलेला बालिश पोरकट मुलगा प्रत्येकातून बाहेर येतो. दुनियादारी पचवण्यासाठी कदाचित हे मुखवटे फेकून बालिश पोरकट वागणं गरजेचं असावं. कदाचित तो काही काळ तरी जिंदगीच आपल्या तालावर खुशी खुशी नाचत असेल.  

पण मग कदाचित या मैत्रीतसुद्धा शाळेतील दुसरी तिसरी अवस्था येत असावी काय? नसावी असं मनापासून वाटतं. पण मैत्रीची मात्रा मात्र कमी होत जात असावी कदाचित. का दुनियादारी इतकी पिळुन टाकत असेल की आपल्यातील अल्लड उथळपणा संपूनच जात असावा? पण मग मैत्री यासाठीच असते ना? दुनियादारी काही काळ पूर्ण विसरून जाऊन, एक रिफ्रेश मारून पुन्हा दुनियादारी झेलण्यास तयार व्हायला?

 

जर भेटणं कमी कमी होत जात राहिलं तर मग कदाचित मैत्रीची expiry date जवळ जवळ येत जाईल. यातला एक टप्पा या आठवड्यात अनुभवायला मिळन  हा वेदनादायी अनुभव होता. असं वाटलं की कदाचित मैत्रीचा हाफ लाईफ पिरियड या आठवड्यात संपला. आता इथून पुढं प्रतिवर्षी १/१२ या प्रमाणात मैत्री कमी होत जाईल काय?

याच विचारात इंटरनेटवर फिरत फिरत youtube वर “दिल चाहता है” मधील गोव्यातील किल्ल्यावरील सिद (अक्षय) समीर (सैफ)  - आणि आकाश (आमिर)चा एक सीन पहिला. त्यात समीर आणि आकाश प्रत्येक वर्षी असच ट्रिपला आपण येत जाऊ असं बोलत असतात. तेव्हा सिद म्हणतो की प्रत्येक वर्षाचं काय घेऊन बसलात,  दहा वर्षात एकदाही भेटायचं अवघड होईल.  याची सुरुवात झाली असेल काय? का शेवटी आकाश म्हणतो तसं “हम दोस्त थे, है और रहेंगे, हमेशा”, हे खरं असेल?

 

-         अभिजित.


 


 

 

 

Comments