अमका तमका फलाना बिस्ताना
कित्येक वर्षे 'क स्टडी ग्रुप'ची बाजू मांडत मांडत अमका लोखंडासारखा टणक अभेद्य झाला. तिच परिस्थिती 'ब स्टडी फोरम'मधील तमक्याची. सुरुवातीला दोघं आपापल्या गटाच्या विचारसरणीची पुस्तकं, तत्वज्ञान वाचायची. विशीतले स्वप्नाळू आदर्शवादाचे दिवस होते ते.त्यावेळी दोघं नानाच्या टपरीवर एकत्र चहा पित एकमेकांच्या विचारसरणीतील दोष दाखवत, कधी आपल्या विचारसरणीचे,विचारवंतांचे आणि नेत्यांचे दोष कबुल करायची. काळ पुढं सरकत असताना दोघ आपापल्या वकुबानुसार प्रगती करत नैसर्गिक उत्क्रांत होत होत आपापल्या गटाच्या मुख्य प्रवक्त्यांच्या गटात सामील झाले. मग गटासाठी आग्रहानं आपापल्या गटाची विचारसरणी कशी योग्य आहे हे मांडता मांडता हळुहळू दोघांच्याही डोळ्यांवर बारीक पडदे तयार झाले, आणि त्यांच्या दृष्टीचा आवाका आकुंचन पावला. एखाद्या झाडाच्या आकार आणि आधार देणाऱ्या पेशी मृत असूनही झाड जिवंत राहावं तसे दोघांचे विचार अंतिम अवस्थेत जाऊन मृत झाले आणि ज्ञानी असल्याच्या अभेद्य जाड सालीत ते दोघे जिवंत राहिले. जणू आपापल्या देशांच्या अर्थव्यवस्था त्यांनी बंदिस्त करून टाकल्या होत्या आणि जगाशी संवाद संपवून टाकला होता. आपापल्या जडावलेल्या विचारसरणींचे संरक्षण करण्यासाठी ते एकमेकांवर हल्ला करायचे.
***
दरम्यानच्या काळात जग बदलत जात होतं. कित्येक वर्षांपूर्वी समुद्रातील पाण्यात असणाऱ्या प्रथिनयुक्त पदार्थात काहीतरी बदल होऊन पुनर्निर्मितीक्षमता निर्माण झाली होती. तो क्षण बटरफ्लाय इफेक्टनुसार मोठमोठ्या बदलांना सामोरा जात जग बदलत बदलत इसवी सणाच्या एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत येऊन आलं, तेव्हा फलान्यानं लोकांना एकत्र आणण्यासाठी म्हणून एक माध्यम निर्माण केलं. तिथून पुढच्या अठरा एकोणीस वर्षानंतर फलाना जगातील सगळ्यात श्रीमंत दहा लोकांमधील एक झाला. दरम्यान अमका आणि तमकाही फलानानिर्मितमाध्यमावर(फ.नि.मा.) आपापल्या गटांचा, आणि त्या गटांच्या साचलेल्या विचारांचा प्रचार प्रसार करू लागले, ते वाचणाऱ्यांच्यात दोन गट पडून अमक्याचे चाहते तमक्याच्या प्रचारावर आणि तमक्याचे चाहते अमक्याच्या प्रचारावर तुटून पडत होते. एकमेकांना शब्दबंबाळ करीत होते.
***
एकदा अमक्याच्या देशातील हत्तीला कुणीतरी मारून त्याचे दात काढून नेले. बातमी फुटून तमक्याला मिळाली. विषय गंभीर होता. तमक्याने फ.नि.मा. वर अमक्याविरुद्ध अतिशय काटेरी शब्दात निषेध नोंदविणारे लिखाण केले. जनमत त्याने प्रचंड खवळले. व्यक्त-हो-तू या नदीला प्रचंड पूर आला. अमका खूप व्यथित झाला, आणि काळ्या पांढऱ्या फरशांवरून सरळ, तिरप्या, अडीच पावलांच्या येरझारा घालू लागला. अचानक त्याचं डोकं प्रकाशमान झालं आणि तो जागेवरच थांबला. मग त्यानं फ.नि.मा. दार उघड म्हणत फ.नि.मा. चं दार उघडलं, आणि त्यात त्यानं तमक्याच्या देशात गेल्या बावन्न आठवड्यात झालेल्या हत्तींच्या मृत्यबद्दल डोळे फिरवणाऱ्या आकडेवारीसहीत लिखाण केलं. जनमत पुन्हा प्रचंड खवळलं. आता काळनिशेदी नदीला प्रचंड पूर आला. दोन्ही नद्यांचे पूर एकमेकात मिसळले आणि अतिप्रचंड मोठा फेसाचा लोंढा दोन्ही देशांवरून वाहून गेला. दोन्ही देशांच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अतिशय प्रभावी असल्याने येणाऱ्या महापुराचा धोका ओळखून एक बटन दाबताच नदीतील पाण्याचा फेस होऊन गेल्यामुळे कुठलीच जीवित वित्त हानी झाली नाही. मात्र ९८४५६ लाख मे. टन भावना दुखल्या गेल्याचे दोन्ही देशांच्या भावना-इजा-नियंत्रण विभागांतर्फे जाहिर केलेल्या अधिकृत आकडेवारीतुन समोर आले. अर्थात सूत्रांच्या माहितीनुसार खरी आकडेवारी याहून खूप मोठी असल्याचे वर्तमानपत्रांमध्ये छापून आले होते.
***
बिस्ताना दोघांचे फ.नि.मा. वरील लिखाण वाचायचा. बिस्तान्याला समाजाची, देशाची, जगाची अतिशय चिंता वाटायची. उठल्यावर, जेवताना, काम करताना, पार्कमध्ये, ध्यान करताना, झोपेत, स्वप्नात त्याला फक्त अमका आणि तमक्याच्या लिखाणातील मुद्दे दिसत असायचे. ते वाचून तो अगदी मनाच्या तळापासून उद्विग्न होत असे. जगाचं कसं होणार या प्रश्नाने तो आत्यंतिक व्याकुळ होतसे, कधी कधी जगाचा विचार करून ढसाढसा रडतसे. मग दुःख हलकं करण्यासाठी बिस्ताना फ.नि.मा. वर विविध कलाविष्कार - सिनेमाचे तुकडे - पाककृती - नृत्याविष्कार - विनोदी ध्वनिचित्रफिती - व्यायाम योगासनांचे प्रकार - संतुलित आहार - आंतरजालव्यसन - अध्यात्मिक गुरूगोष्टी - सकारात्मक विचारवादी ध्वनिचित्रफिती - फजितीकृत विनोदनिर्मिती ध्वनिचित्रफिती असे विविधांगी मनोरंजन करून घेतसे. या वैचारिक आणि घटकाभर मनोरंजनादरम्यान येणाऱ्या जाहिरातींनी मात्र बिस्ताण्याच्या सामाजिक बंधीलकीमध्ये व्यत्यय येतसे. तसेच फ.नि.मा. चे कर्मचारी अधूनमधून बिस्तान्याच्या घरी येऊन त्याच्या घराचे, त्याचे, त्याच्या वृत्तींचे फोटो काढून नेत असत, त्या बदल्यात त्याला फ.नि.मा. मोफत वापरता येतसे. ह्या जाहिराती आणि फोटो सोडले तर बिस्ताच्या सामाजिक बांधिलकी जपण्याच्या छंदात कुठलाही व्यत्यय येत नसे, आणि आजही येत नाही.
- बिस्ताना अर्थात दस्तुरखुद्द अभिमन्यू कदमसो.
Comments
Post a Comment