#यादृच्छिक
#यादृच्छिक
#random
This particular branch of the unidirectional forwarding branches of randomness is too rigid to move, having inherent resistance to move freely further. And yes, it's true that you're on your own while you are at such narrow and viscous passages. And it's also true, experience is a totally different thing than the bubbles of words. Amidst this chaos, I don't know why I yearn for the person I love the most in this entire universe, my late grandfather, तात्या. पांढरा लेंगा, सदरा आणि गांधी टोपी, सायकल, कंदील, दुधाच कॅन तथा क्यांड, आणि नेहमीच समाधानी आणि प्रसन्न चेहरा. कुठल्याही hesitation शिवाय त्यावेळी कुणाकडं व्यक्त होऊ शकेन असा एकमेव माणूस, आणि त्यामुळं खूप वेगवेगळ्या विषयांवर त्यांच्याशी गप्पा व्हायच्या. त्यांना त्या वयातही नव्या गोष्टी ऐकायला आवडायचं. मी शाळेत नवीन काही भारी शिकलो की रात्री जेवल्यानंतर त्यांना सांगायचो आणि ते खूप मनापासून ते ऐकायचे, एवढा मोठा माणूस माझं काहीतरी मन लावून ऐकतो, हे मला खूपच भारी वाटायचं. तेपण नवीन काहीकाही सांगायचे. रात्री जेवण झाल्यानंतर अंगणात अंथरूण टाकून, त्यावर चांदण्या पाहत पडणं, तात्यांसोबत गप्पा मारणं आणि त्यांच्याकडून नवी नवी माहिती मिळवणं, गोष्टी ऐकणं, हा अनुभव इतका खोलवर झिरपत गेला आहे, त्या चांदण्यात भिजलेला त्या आठवणींचा ओलावा शेवटपर्यंत तसाच राहील. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी लोककथांच्या परंपरेतील असायच्या. अजूनही त्यांच्या गोष्टी, त्यांचा आवाज, गोष्ट सांगण्याच्या शैलीसह आठवतो. त्यांनी चांदण्या मोजायला सांगणं, नक्षत्रे दाखवणं, मी त्यांना शाळेतील काहीतरी सांगणं, त्यांच्या गोष्टी ऐकणं, या सगळ्यानी आमचं (मी आणि दीदी) बालपण समृद्ध केलं. या सगळ्या आठवणींवरच मी माझी एकुलती मोडकी तोडकी shortfilm "हरवलेलं चांदणं" केली होती. अजूनही लहानपणीचे ते क्षण पुन्हा जगण्याचा प्रयत्न म्हणून अधेमध्ये जिज्ञासा सोबत टेरेसवर जाऊन चांदण्यात गप्पा मारतो, तिला गोष्टी सांगतो, तिच्यासोबत चांदण्या पाहत बसतो. सातवीत असताना मराठीत डॉल्फिनवर एक धडा होता. तो वाचल्यावर मी खूपच अचंबित झालो होतो, की डॉल्फिन इतके हुशार असतात, ते एकमेकात संपर्क करतात. मी हे सगळं तात्यांना सांगितलेलं आणि त्यांनीही तितक्याच उत्सुकतेनं ऐकलेल, ही अगदी लख्ख आठवण. सायकलीच्या नळीला टॉवेल गुंडाळून त्यावर मला बसवून शाळेत सोडायला आलेले तात्या आणि वर्गात सोडून जाताच मी वर्गातून बाहेर रडत पळून आलेलो आणि परत त्यांनी वर्गात बसवलं हेही आठवतं. तात्यांची आठवण झाली की सगळं सगळं आठवू लागतं. तात्यांचा शनिवारी उपवास असायचा, उपवासाला ताटात खिचडी घेऊन कुंडा भरून ताक त्यात ओतून खिचडी खायची त्यांची सवय होती. अजूनही शनिवारी मी अशीच खिचडी खातो. तात्यांमुळं आणि संजय खानच्या "जय हनुमान" मलिकेमुळ साधारण सातवी - आठवीपासून मी शनिवारी उपवास सुरू केला. कालांतराने देव - धर्म यावर वयानुरूप विचारात बदल होत गेले. देव असतो का, देव म्हणजे काय, असले विचार करत - होत स्वतः ला अज्ञेयवादी म्हणणारा झालो. अजून हा प्रवास सुरूच आहे. या प्रवासात काही काळ नास्तिक होण्याचा टप्पाही होता, त्या टप्प्यात "शनिवारी उपवास ठेवणारा नास्तिक" असले टोमणेही ऐकले, त्याला कुचाकडी स्पष्टीकरणेही दिली, दांभिकपणा कबूल केला, पण उपवास आणि ताक खिचडी सुटली नाही - जशी तात्यांना लागायची अगदी तशी खिचडी आणि ताक. आठवीच्या उन्हाळी सुटी दरम्यान आणि नववी सुरू होताना तात्या मला मोडी लिपी शिकवत होते. त्यावेळी सतीश झेंडेकाका शेतातील कामाला आमच्याकडे असायचे. काही दिवसांपूर्वी भेटले तेव्हा तात्यांच्या आठवणी सांगत होते. दुपारी तात्या झेंडेमामांना झोप काढा म्हणायचे, माई (आजी) आल्या की सांगतो, त्या येईपर्यंत झोप काढा एक असे सांगायचे. माई खूप कडक होत्या.
तो दिवस अजून आठवतो. तात्यांना छातीत दुखत होत म्हणून पुण्याला दवाखान्यात नेलं होत. मी नववीत होतो. त्या दरम्यान तात्यांकडून धार काढायला शिकत होतो. तात्या पुण्याला गेल्यामुळे मी झेंडे काकांसोबत मळ्यातून दूध घेऊन घरी येत होतो. चौकातून घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर असणाऱ्या कठड्यावर माणसं जमून बसली होती आणि घराकडे बोट दाखवून काहीतरी कुजबुजत होती. मग झेंडेकाका मला तू जा घरी म्हणून चौकातच थांबले. मी जसजसा घराकडे जाऊ लागलो तसं मला घराजवळ लोक घुटमळत असल्यासारखे दिसायला लागले. घरी माई अंगण झाडत होत्या. अचानक आबा आले आणि माईंना त्यांनी काहीतरी सांगितलं आणि माईं जोरात रडू लागल्या. मग शेजारच्या बायका आल्या. माझ्या डोळ्यातूनही पाणी येऊ लागलं. त्या दिवसाची क्षणचित्र डोळ्यांसमोर भरभर फिरू लागतात.
अशीच कधीतरी तात्यांची प्रचंड मोठी, एकदम डोंगराएवढी आठवण येते. पांढरा लेंगा, सदरा, गांधी टोपी घातलेला अत्यंत साधा, समाधानी, प्रसन्न, शहाणा, विरक्त माणूस डोळ्यांसमोर दिसत राहतो. आणि...And at this very moment, the chaos again takes over the nostalgia. The sudden realisation of the unimaginable turns that the branch of randomness is going to take. This, the very text I am now typing with the qwerty keypad, in the notes, and which I am soon going to post on social media, is drainage of over accumulated, choked thoughts.
________
काल - परवा गावात मतदानाला रांगेत उभा असताना ऐकलेला संवाद.
पुण्याला कामानिमित्त राहायला गेलेले एक काका माझ्या मागं होते. गावातील एक मुलगा जाताजाता त्यांना "भेटत नाही काका किंवा बऱ्याच दिवसांनी भेटला" असं काहीसं म्हणाला, त्यावर ते काका मजेन म्हणाले ," तुम्हीच आम्हाला पुण्याला पाठवलंय". त्यावर तो मुलगा जाताजाता म्हणाला "माती बोलवलच की कधीतरी गावाकड..मग यावच लागल की.."
_______
गेल्याच आठवड्यात Cinema Paradiso पाहिला. महायुद्धात ज्याचे वडील गेले आहेत असा आणि आईसोबत इटलीतील एका गावात (छोट्या शहरात) राहणारा लहान साल्वातोर, ज्याला सिनेमाचे भयंकर वेड आहे. त्या गावातील एकमेव Cinema Paradiso नावाच्या थिएटरमध्ये जाऊन तो सिनेमे पाहत असतो. त्या थिएटरमधील प्रोजक्शनीस्ट आल्फ्रेडो, त्याचा दोस्त बनतो. नंतर अल्फ्रेडो साल्वाला त्याचं काम शिकवतो, पण नंतर गाव सोडून शहरात जा म्हणतो, गाव सोडलं तर मोठा होशील असं म्हणतो. मग साल्वा गाव सोडतो ते पुन्हा परत येतो ते आल्फ्रेडो गेल्याची बातमी मिळाल्यावरच. साल्वा मोठ्या शहरातून आपल्या जुन्या गावात, मुळांकड येत असताना त्या गावाच्या, चौकाच्या, सिनेमाच्या,थिएटरच्या, थिएटरच्या इकोसिस्टीम मध्ये असणाऱ्या रंगीबेरंगी माणसांच्या, अल्फ्रेडोच्या त्याला येत असलेल्या आठवणी म्हणजे हा चित्रपट. शेवटी अल्फ्रेडोची अंत्ययात्रा त्या गावातून जात असताना गावातील प्रसिद्ध चौकात आल्यावर सगळे थांबतात आणि त्या थिएटरकडे पाहतात. तेव्हा गावाच्या त्या भागाची, चौकाची, थिएटरची दृश्यं आहेत. गावात, त्या चौकात तेव्हा बराच बदल झालेला आहे. थिएटर बंद पडलं आहे, आणि तिथं आता पार्किंग होणार आहे असं सालवातोरला समजत. त्यातील एका दृश्यात वृद्ध झालेल्या त्या गावातील रंगीबेरंगी माणसांवरून कॅमेरा फिरतो. एक era संपत आल्याचं ते दृश्य आणि नंतर ते थिएटर पडण्याचं दृश्य पाहताना आत काहीतरी आपलं तुटत चाललं असल्यासारखं वाटलं.
काही दिवसांपूर्वी अलेजांद्रो इन्यारीत्यू चा bardo पाहिला होता. आवडला होता.
सुंबरान माझा मराठीतील खूप आवडत्या चित्रपटांमधील एक.
देऊळसुद्धा.
आपल्या मुळांकडे परत जाण्याची ओढ, nostalgia, मुळ सुटून जाण्याची भीती, किंवा मुळ सुटून गेल्याचं आणि आता झाड नवीन ठिकाणीही रुजणार नाही, ते अधांतरीच राहणार असल्याची तुटलेपणाची जाळत जाणारी जाणीव, है सगळं किती वैश्विक आहे.
_________
खंडेराव,
पाकिस्तानातून खानदेशात येताना
मुळांच्या शोधात बुडत जातोस...
खंडेराव,
पाच दिवस गुंता सोडवत बसून,
एखादा दिवस तरी वेस शिवण्यासाठीची तुझी धडपड,
कुणाला, कशी व का समजावी?
खंडेराव,
एकेक पान गळत चाललं,
घोडा दौडतच राहणार,
ही लेंगा सदरा टोपी घातलेली,
बैलगाडी - सायकल चालवणारी,
वगापर्यंत तमाशा पाहणारी,
हिरवी साडी मोठ्ठं कुंकू लावणारी,
अंगण - भिंती सारवणारी,
जात्यावर गाणी गाणारी,
अस्सल देशी माणसं डोळे भरून पाहून घे.
खडेराव,
गावात गावपण आहे तोवर गावात येत राहा,
नाही बोलता येत, नको बोलू,
तुझा कोश चिवट आहे, असुदे,
पण मुळं सुटू देऊ नको,
बरबटलेल, हापापलेल झेलून घे,
आणि नितळ पाण्याचा उतारा देण्यासाठी ये.
खंडेराव,
जाईल कधीतरी छाताडावरून विकासरथ,
आणि विकासच विकास होईल लवकर,
तोपर्यंत वेळ आहे.
येत रहा.
खंडेराव,
बघ,
जमणार नाही पण सांगतो,
काय ठेवलंय त्या धुराड्या वखवखीत?
अभिमन्यू होऊन बसला आहेस,
पण वाट दिसली तर सोडू नकोस,
सगळ सोडून ये परत,
कायमचा.
बघ,
जमेल तेव्हा नक्की ये.
अभिजीत कदम.




Comments
Post a Comment